आरोग्य खात्यातील रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
करार संपलेल्या कर्मचाऱ्यांना भविष्यातील भरतीत प्राधान्य
9 March :- सरकारी रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त ९ हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत दिले. कोरोना काळात २६ हजार ४८६ कंत्राटी पदे भरल्याची तसेच ज्यांचा करार संपला आहे अशा वैद्यकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना भविष्यातील भरतीत प्राधान्य देणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी विधान परिषदेत केली.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
आरोग्य खात्यात १८ हजार पदे रिक्त असून त्यापैकी ९ हजार पदे “क’ आणि “ड’ वर्गातील आहेत. यापैकी “ड’ वर्गाच्या रिक्त जागच्या बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून २ महिन्यांत पदे भरणार असल्याचे टोपे म्हणाले.उर्वरित “अ’ आणि “ब’ वर्गातील ५० टक्के म्हणजे ९ हजार पदांच्या भरतीसाठी मुख्य सचिव व राज्यपाल यांच्या स्तरावर नियमाबाबतचा प्रलंबित निर्णय महिन्यात होणार आहे. कोविड काळात कंत्राटी स्वरूपात भरलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येत असल्याचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता.
करारानुसार ते करण्यात येत असल्याने भविष्यातील भरतीत त्यांना कोविड अनुभवाच्या आधारावर प्राधान्य देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे टोपे म्हणाले. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत बालकांच्या झालेल्या मृत्यूबाबत सदस्य गिरीशचंद्र व्यास यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना टोपे बोलत होते. मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. नवीन बांधकाम होणाऱ्या रुग्णालयात फायर एनओसी व इतर आवश्यक त्या एनओसी असल्याशिवाय हस्तांतरित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्याचे टोपे यांनी या वेळी सांगितले.