महाराष्ट्र

‘या’ ठिकाणी १४ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद राहणार

ऑनलाइन पद्धतीने शिक्षण राहणार सुरू

28 Feb :- कोरोना संकटाची तीव्रता वाढू लागल्यामुळे पुण्यात १४ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू राहील. सर्व अनुदानीत आणि विनाअनुदानीत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लास १४ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस


आयुक्तांच्या आदेशानुसार पुण्यात दररोज रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी सुरू राहणार आहे. संचारबंदीच्या काळात कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. पुण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये पाचवी ते नववी आणि अकरावी या वर्गांच्या खासगी कोचिंग क्लासवर बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे.


नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये शुकशुकाट दिसला. अमरावती जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाला आहे.
पुणे जिल्ह्यात २७ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ हजार ६९२ झाली होती. तर औरंगाबाद जिल्ह्यात २७ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार ३१५ झाली होती.

नागपूर (९७६८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण), वर्धा (९११ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण), यवतमाळ (१३७४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण) या जिल्ह्यांमध्येही कोरोना संकटाची तीव्रता वाढत असल्याचे २७ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीतून स्पष्ट झाल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.