उन्हाळ्या अगोदरच राज्यात विजेची मागणी वाढली
आयात कोळसाही वाढवला
28 Feb :- उन्हाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात राज्याची विजेची मागणी वाढली आहे. शनिवारी २४ हजार ५५१ मेगावॅट विजेची गरज भासली. एप्रिल व मे महिन्यात राज्याची मागणी २६ हजार मेगावॅटपर्यंत पोहाेचण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे विजेची मागणी ६ हजार मेगावॅटपर्यंत घसरली होती.कोरोनाचे संक्रमण वाढत असले तरी राज्यातील औद्योगिक, कृषी व घरगुती वीज वापर आता वाढत आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
शनिवारी राज्याला २४ हजार ५५१ तर महावितरणला २२ हजार ४१ मेगावॅटची गरज भासली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने विजेची मागणी सुमारे दीड हजार मेगावॅटने वाढली आहे. आगामी काळात एप्रिल व मे महिन्यात विजेचा वापर सर्वाधिक राहणार असल्याने या काळातही उच्चांकी विजेची मागणी राहील, या दृष्टीने महानिर्मिती व वितरणने नियोजन केले आहे.
सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा समाधानकारक आहे.महानिर्मितीने सध्या वेस्टर्न कोल्ड फील्डच्या कोळशासोबतच ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या कोळशाचा वापरही वाढवला आहे. यामुळे जुन्या संचातूनही पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करता येणार आहे. आयात कोळशाचा उष्मांक अधिक असल्याने कमी प्रदूषण व इंधनात विजेची निर्मिती करता येईल.
महानिर्मितीने विजेची मागणी वाढत असल्याने जुने व बंद असलेले संचही सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यानुसार भुसावळ व परळीचे जुने संच वीजनिर्मितीसाठी सुरू केले आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यास खासगी वीज उत्पादक कंपन्यांसोबतच बंद पडलेले जुने संच सुरू करून गरज भागवली जाईल.