अंबाजोगाई आरटीओ कार्यालय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी
आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश
24 Feb :- अंबाजोगाई : स्व.डॉ. विमलताई मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे १६ वर्षांपूर्वी अंबाजोगाई येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर होऊन सुरु झाले होते. आता त्यांच्या सुनेच्या म्हणजेच आ. नमिता मुंदडा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून ११.३१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच लोखंडी सावरगाव शिवारात गट क्र.६३ मध्ये दहा एकरात आरटीओ कार्यालयाची सुसज्ज आणि अद्यावत इमारत उभी राहणार असून नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांनी २००४ साली अंबाजोगाईसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय प्रयत्नपूर्वक मंजूर करून आणले. या कार्यालयासाठी लोखंडी सावरगाव परिसरात गट क्र.६३ मधील दहा एकर जमीन देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. या कार्यालयामुळे अंबाजोगाईसह परळी, माजलगाव, केज, धारूर आणि वडवणी या तालुक्यातील वाहनधारकांची मोठी सोय झाली. सुरुवातीला हे कार्यालय यशवंतराव चव्हाण चौकात भाडेतत्वावर खाजगी जागेत होते. त्यानंतर ते जोगाईवाडी शिवारात हलवण्यात आले. तर, जड वाहनांची तपासणी आणि चालक परवान्याच्या चाचण्या मात्र चार किमी अंतरावर लोखंडी सावरगाव परिसरातील तकलादू ट्रॅकवर घेण्यात येतात.
मुबलक जागेअभावी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनाही विविध कामांसाठी दोन-दोन ठिकाणी धावपळ करावी लागते. त्यामुळे अंबाजोगाई येथील कार्यालयासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज इमारत बांधण्यात यावी यासाठी आ. नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी मागील एक वर्षापासून पाठपुरावा सुरु ठेवला होता. औरंगाबाद येथील उपमुख्य वास्तूविशारद यांच्याकडून बांधकामाचा नकाशा तयार करण्यात येऊन अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानंतर हा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून परिवहन विभागास पाठविण्यात आला.
आ. नमिता मुंदडा यांच्या वतीने अक्षय मुंदडा यांनी मुंबईत मुक्काम ठोकून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेत हा प्रस्ताव विविध पातळ्यांवर पुढे ढकलण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर परिवहन विभागाने सदर इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी देत ११.३१ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या मंजुरीमुळे आरटीओ कार्यालयाला स्वतंत्र आणि सुसज्ज इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांचे आभार मानले आहेत.
नवीन आरटीओ कार्यालय दहा एकर जागेत उभारण्यात येणार आहे. त्यात दोन मजली मुख्य कार्यालयीन इमारतीसह चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठीचे निवासस्थान असतील. मुख्य इमारत फर्निचर, सोलर पेनेल, अग्नी सुरक्षा उपकरणे, रेन हार्वेस्टिंग आदी सुविधांसह सुसज्ज असेल. दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी स्वतंत्र वाहनतळ असतील. सर्वात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी वाहन विषयक विविध चाचण्यांसाठी चार अद्यावत ट्रॅक असणार आहेत.
बीड आणि अंबाजोगाई येथील आरटीओ कार्यालये सुरु झाल्यापासून ते आजतागायत भाड्याच्या जागेत आहेत. परंतु, आता बीडच्याही आधी अंबाजोगाई कार्यालयाला स्वतःची इमारत मिळणार आहे. त्यामुळे बीड कार्यालयालाही स्वतंत्र इमारत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.