भारत

मोदी सरकारचा मोठा निर्णय; १ मार्चपासून मोफत लसीकरण

वाचा सविस्तर, कुणाला मिळणार मी मोफत लस?

24 Feb :- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोरोना प्रतिबंधित लसीकरणाच्या संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, १ मार्च २०२१ पासून देशातील ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासोबतच ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनाही कोरोना लस दिली जाणार आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

प्रकाश जावडेकर यांनी पुढे म्हटलं की, १ मार्च २०२१ पासून १०,००० सरकारी आणि २०,००० हून अधिक खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे. सरकारी केंद्रांवर लस मोफत दिली जाणार आहे. प्रकाश जावडेकर यांनी पुढे म्हटलं, “ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयातून लस घ्यायची आहे त्यांना लसीसाठी पैसे द्यावे लागतील. लसीकरणासाठी नेमकी किती फी असेल याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून येत्या ३-४ दिवसांत निश्चित करण्यात येईल.”

देशभरात आतापर्यंत १.१९ कोटींहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला कोविड १९ प्रतिबंधित लस देण्यात आली आहे. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २,५३,४३४ सत्रांत १,१९,०७,३९२ जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये ६४,७१,०४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. तर १३,२१,६३५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १०,२८,२७१ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधित लस देण्यात आली आहे.