News

ठाकरे-पवारांची ‘मातोश्री’वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना उधाण

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल संध्याकाळी तातडीची व महत्त्वाची बैठक झाल्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सकाळी अचानक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. मात्र, पडद्यामागे नक्कीच काहीतरी घडामोडी घडत असल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली. त्यातच माजी मुख्यमंत्री व सध्या भाजपचे खासदार असलेले नारायण राणे यांनी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठक झाली. महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊतही या बैठकीला उपस्थित होते, अशी सूत्रांची माहिती आहे. तब्बल दीड तास ही चर्चा चालली. या बैठकीत करोनाच्या परिस्थितीबरोबरच केंद्र सरकारच्या संभाव्य भूमिकेवर चर्चा झाल्याचं कळतं. अर्थात, संजय राऊत यांनी आज ट्विट करून सरकारला कुठलाही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘सरकारच्या स्थिरतेबाबत कुणी बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी,’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही महाराष्ट्रात सरकार स्थापन करता न आल्याचा सल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात आहे. त्यातूनच ठाकरे सरकार कसे अस्थिर होईल, यासाठी भाजपकडून सातत्यानं प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जातं. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी याची झलक दिसली होती. आता करोनाच्या संकटाचं निमित्त करून केंद्र सरकार पुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळंच पवार स्वत: ‘मातोश्री’वर गेल्याचं बोललं जातं.