क्रीडा

क्रिकेट विश्व दुःखात; ‘या’ माजी वेगवान गोलंदाजाचं अपघातात निधन

वयाच्या ६३ व्या वर्षी झाला दुर्दैवी मृत्यू झाला

7 Feb :- क्रिकेट विश्वातून नुकतीच एक दुःखद बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज एज्रा मोसले यांचा एका रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते 63 वर्षांचे होते. शनिवारी बारबाडोसच्या एबीसी महामार्गावर सायकल चालवताना मोसले यांना सुसाट वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली आहे. या जोरदार धडकेत एज्रा मोसले यांचा मृत्यू झाला आहे. एज्रा मोसले यांनी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला वेस्ट इंडीजकडून दोन कसोटी सामने आणि नऊ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

वेस्ट इंडीजचा माजी खेळाडू जिमी अ‍ॅडम्स याने मोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एज्रा मोसले यांनी 79 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 279 विकेट्स घेतल्या आहेत. तर 79 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्यांनी 102 गडी बाद केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी क्रिकेट कोचिंगही केलं आहे. मोसले यांनी बारबाडोस येथे कनिष्ठ स्तरावर प्रशिक्षण दिल्यानंतर काही काळ वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघासोबतही काम केलं आहे.

एज्रा मोसले यांनी विव्हियन रिचर्ड्सच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजसाठी दोन कसोटी सामने खेळले. दोन्ही सामने त्यांनी इंग्लंडविरुद्ध खेळले आहेत. या दोन सामन्यात मोसले याने सहा गडी बाद केले होते. पण पाठीच्या दुखापतीमुळे प्रथम श्रेणीत उत्तम कामगिरी करूनही त्याला बरीच वर्षे क्रिकेटपासून दूर रहावं लागलं होतं.


वयाच्या 32 व्या वर्षी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. यावरुन त्याचा क्रिकेट कारकीर्दीतला संघर्ष लक्षात येऊ शकतो. मोसले यांनी पहिल्याच कसोटीत धमाकेदार कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली होती. त्यांचा हा सामना अविस्मरणीय असण्याचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या वेगवान चेंडूने इंग्लंडचा महान फलंदाज ग्राहम गूचचा हात मोडला होता.