किल्लेधारुर ते अंबाजोगाई बसची एकच फेरी
किल्लेधारुर ते अंबाजोगाई बसची एकच फेरी ; प्रवाशांनी पाठ फिरविल्याने बाकी गाड्या बसस्थानकातच.
किल्लेधारूर दि.२५(प्रतिनिधी) तब्बल दोन महिने बंद असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा २२ मे पासून सुरु करण्यात आली. मात्र या लालपरीच्या प्रवासाला प्रवाशांनी पाठ फिरवल्याने किल्लेधारुर बसस्थानकातून सोमवारी (दि.२५) किल्लेधारुर ते अंबाजोगाई अशी बसची एकच फेरी झाली असून या फेरीत आगारास ३६० रुपये ऊत्पन्न मिळाले आहे. कोरोनाचा फटका एसटीला चांगलाच बसला असून एकूण उत्पन्नातही मोठी घट होत आहे.
राज्य शासनाने अध्यादेश काढून नॉन रेड झोनमध्ये जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरुन नॉन रेड झोनमध्ये असलेल्या बीड जिल्ह्यात दि.२२ पासुन जिल्हा अंतर्गत बससेवा सुरु करण्यात आली. किल्लेधारुर आगारातून बीड, अंबाजोगाई, केज साठी दर तासाला एक बस सोडण्यात येणार आहे. एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशी व इतर नियमांचे पालन करण्यात येणार आहे. दि.२२ मार्च पासुन बंद असलेली बससेवा बरोबर दोन महिन्यानंतर सुरु झाली आहे. किल्लेधारुर आगाराचे या दोन महिन्यात जवळजवळ तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बससेवा प्रवाशांच्या मागणी प्रमाणे किंवा प्रतिसादाप्रमाणे सुरु राहणार आहे. पहिल्या दिवशी केज, माजलगाव, अंबाजोगाई साठी बस फेऱ्या करण्यात आल्या. सोमवार दि.२५ रोजी सकाळी अंबाजोगाई, केज, बीड व माजलगांवसाठी सात वाजता बस स्थानकावर गाड्या मार्गस्थ होण्यासाठी दाखल झाल्या. परंतू प्रवाशांनी एसटी बसकडे पाठ फिरवल्याने १०ः१५ वाजता १६ प्रवाशांना घेऊन एक गाडी अंबाजोगाईकडे मार्गस्थ झाली. परतीच्या प्रवासाला सदर गाडीस एकही प्रवाशी मिळाला नाही. या गाडीचे एकूण ऊत्पन्न ३६० रुपयांचे झाले. इतर मार्गावरील बस फे-या प्रवाशी न मिळाल्याने रद्द करण्यात आल्याचे समजते. तब्बल दोन महिन्यानंतर सुरु झालेल्या लालपरीकडे सध्या तरी प्रवाशांनी पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे. यामुळे राज्य परिवहन मंडळाला मोठा फटका सहन करावा लागत आहे.