गेल्या 60 वर्षांपासून गुहेतच आहे वास्तव्य, राम मंदिरासाठी या साधूने दिलं 1 कोटींचं दान
हरिद्वार, 29 जानेवारी: देशभरातील अनेकांचं स्वप्न असणारं अयोध्येतील राम मंदिर आकार घेत आहे. याकरता देशभरातून निधी गोळा केला जात आहे. प्रत्येकजण यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान ऋषिकेशमधील एका साधूबाबांनी या देणगी अभियानामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल एक कोटी रुपये मंदिर निर्माणासाठी दान केले आहेत.
83 वर्षांचे असणारे संत स्वामी शंकर दास गेल्या 60 वर्षांपासून गुहेतच राहतात. त्यामुळे त्यांनी हे पैसे कसे जमवले असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांचे गुरू टाट वाले बाबा यांच्या गुहेत भाविक आणि अनुयायांनी दिलेल्या देणगीतून त्यांनी हे पैसे जमा केले आहेत आणि ते आता राम मंदिर निर्माणासाठी देत आहेत.
ऋषिकेशमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ते चेक घेऊन पोहोचले. जेव्हा त्यांचे खाते तपासण्यात आले तेव्हा त्यांनी चेकबाबत दिलेली माहिती खरी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचा चेक बाउन्स होण्याचा प्रश्न निर्माण झाली नाही. बँकेचे पदाधिकारी देखील शंकर दास यांच कहाणी ऐकून काहीसे आश्चर्यचकित झाले होते.
त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवर संघांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून दानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. RSS च्या जिल्हा संचालकांनी तो चेक स्विकारला. स्वामींनी दिलेल्या माहितीनुसार राम मंदिराच्या निर्माणासाठीच त्यांनी तो निधी जमा केला होता. महर्षी महेश योगी, विश्व गुरू महाराज आणि मस्तराम बाबा यांचे समकालीन असणारे टाट वाले बाबा हे संत स्वामी शंकर दास यांचे गुरु. 60 वर्ष गुहेत राहून त्यांनी मिळालेला पैसा राम मंदिरासाठी देण्याचे ठरवला आहे.
राम मंदिर निर्माणासाठी अनेक दिग्गजांनी देखील दान दिले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील पाच लाखांची देणगी राम मंदिरासाठी देऊ केली होती. शिवाय अनेक संस्थांनी या कामात निधी गोळा करण्याचा पुढाकार घेतला आहे.