News

शिवसेनेची साद, भाजपचा प्रतिसाद, जवळीक वाढली, पुन्हा युतीचे संकेत?

कल्याण, 29 जानेवारी : 2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडत महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झालं. सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मिळून सत्ता स्थापन केली. राज्यात महाविकासआघाडीचा प्रयोग झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाविकासआघाडी करण्याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीने सकारात्मक भूमिका घेतली, पण काँग्रेसनं मात्र मुंबईत स्वबळाची भाषा केली. एकीकडे महाविकासआघाडी म्हणून निवडणुका लढण्याचा प्रयत्न सुरू असताना कल्याण-डोंबिवलीमध्ये (KDMC) मात्र शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा युती होते का? याची चर्चा सूरू झाली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घटनांवरून त्याचे संकेत मिळत आहेत, पण याबाबत अजून कोणतंही स्पष्टीकरण मोठ्या नेत्यांकडून देण्यात आलेलं नाही.

26 जानेवारीला शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) भाजपच्या कार्यक्रमात न बोलावता गेले. या कार्यक्रमात त्यांनी केलेलं भाषण चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवा, पण मनात डिस्टन्स ठेवू नका, असं श्रीकांत शिंदे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या समोर म्हणाले. श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनीही प्रतिसाद दिला आहे. ‘ही चांगली गोष्ट आहे. मनात डिस्टन्स राहिला नाही, तर विकास कामं होतील आणि शहरही चांगलं होईल,’ असं गणपत गायकवाड म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीचं समीकरण

कल्याण डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फार ताकद नाही. तरीही राष्ट्रवादीने काही दिवसांपूर्वी शिवसेनेवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवरून सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली होती. जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेला शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.