राज ठाकरे हाजिर हो, बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी
नवी मुंबई, 28 जानेवारी : वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackery) यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने (Belapur court)वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना आता 6 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसेसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची बेलापूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे आता बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. तसंच, राज ठाकरे यांनी 6 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.