News

महाराष्ट्रासाठी दु:खद बातमी, दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात नंदुरबारच्या महिला शेतकऱ्याचा मृत्यू

नंदुरबार, 27 जानेवारी : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपेक्षा  शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. एकीकडे दिल्लीतील हिंसाचारामुळे आरोप प्रत्यारोप होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बातमी आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दिल्ली येथील शाहजहापुर बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलन महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबरी गावातील महिला शेतकरी सीताबाई रामदास तडवी सहभागी झाल्या होत्या.  56 वर्षीय सीताबाई या 16 जानेवारीपासून शहाजहापूर येथे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आज सकाळी त्यांचा थंडीच्या कडाक्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सीताबाई तडवी यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख केले आहे. ‘दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी नंदूरबारच्या अंबाबरी गावातील महिला शेतकरी सीताबाई रामदास तडवी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे’ असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सीताबाई तडवी यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

तसंच, केंद्र सरकार आपल्या अहंकारासाठी आणखी किती शेतकऱ्यांचा बळी घेणार आहे? असा संतप्त सवाल थोरात यांनी थेट मोदी सरकारला विचारला आहे. शेतकरी आंदोलनात कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत 70 हुन अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

सीताबाई तडवी या शेतकरी आंदोलनात कायम सक्रिय राहिल्या होत्या. मुंबईत वन जमीन हक्कासाठी त्यांनी उपोषण केले होते. यासाठी निघालेल्या नंदूरबार ते मुंबई अशा 480 किमी पायी यात्रेत त्या सहभागी झाल्या होता. या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते. 2018 मध्ये सुद्धा तडवी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली होती. सीताबाई यांचे संपूर्ण कुटुंब हे त्यांच्यासोबत आंदोलनात सहभाग राहिले आहे.