‘या’ दिवशी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा धडकणार थेट संसदेवर
शेतकरी नेते दर्शनपाल सिंह यांनी दिले स्पष्टीकरण
25 Jan :- दिल्लीच्या सीमेवर आज सलग 61 व्या दिवशी शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या 60 दिवसांपेक्षा अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेले शेतकरी उद्या ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकद सरकारला दाखवणार आहे. दरम्यान शेतकरी नेते दर्शनपाल सिंह म्हणाले, 1 फेब्रुवारीला संसदेवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये देशातील विविध भागातून शेतकरी सहभागी होणार आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 29 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये आत्तापर्यंत 10 बैठका पार पडल्या, त्यानंतरही कुठला तोडगा निघू शकलेला नाही. कृषी कायद्यांना दीड वर्षासाठी स्थगिती देण्याची एक मोठी ऑफरही सरकारनं देऊन पाहिली. मात्र, कायदा मागे घ्या याच मागणीवर शेतकरी ठाम आहेत.
सरकारला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपली ताकद दाखवून देण्यासाठीच त्यांनी आता ट्रॅक्टर मोर्चाची जोरात तयार सुरु केली आहे. दिल्लीच्या चार सीमांवर जिथे आंदोलन सुरु आहे त्या चारही सीमांवरुन उद्या हे ट्रॅक्टर दिल्लीत बाहेर पडतील. 26 जानेवारीची परेड संपली की ही परेड सुरू होईल. पोलिसांचा दावा 30 हजार ट्रॅक्टर असतील तर शेतकऱ्यांचा दावा अडीच लाख ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याचा आहे. दरम्यान, नवी दिल्लीत 11 व्या फेरीची बैठकही निष्फळ ठरली आहे. बैठकीची पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही.