जेल पर्यटनाची सुरुवात 26 जानेवारीला होणार- गृहमंत्री
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती
23 Jan :- येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या उपक्रमाचं उद्घाटन करतील. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात राज्यात असलेल्या येरवडा आणि इतर तुरुंगांचं खूप महत्व आहे. अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना या उपक्रमात जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून याची सुरुवात करत आहोत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. “शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसंच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे.” असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच येरवडा कारागृहापाठोपाठ राज्यातील इतरही कारागृहांमध्ये अशाच प्रकारे पर्यटन सुरु करण्याचा विचार असल्याचं मंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं आहे.
दरम्यान, 26 जानेवारीपासून पुण्यातील येरवडा कारागृहात जेल पर्यटन राबवण्याचा निर्णय गृहविभागाने घेतलाय. या जेल पर्यटनाच्या माध्यमातून नागरिकांना येरवडा कारागृहाची सफर घडवण्यात येणार आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील मोठा भाग हा येरवडा कारागृहाशी जोडला गेलाय. महात्मा गांधी यांच्यासह अनेक नेते स्वातंत्र्य चळवळीदरम्यान येरवडा कारागृहात बंदिस्त होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पुणे करार देखील येरवडा कारागृहातच पार पडला होता. स्वातंत्र्यानंतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमधे दोषी ठरलल्या गुन्हेगारांना या कारागृहात फाशी देण्यात आली.
देशाचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी असलेल्या जिंदा आणि सुखा यांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती. मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल अमीर कसाब यालाही येरवडा कारागृहातच फाशीवर लटकवण्यात आलं होतं. येरवडा कारागृहातील अशी ठिकाणा या कारागृह पर्यटनादरम्यान पाहता येणार आहेत. त्यासाठी तुरुंग प्रशासनाकडून गाईड देखील पुरवण्यात येणार आहे. एकावेळी 50 व्यक्तींना या कारागृह पर्यटनासाठी तुरुंगामध्ये सोडण्यात येईल. त्यासाठी किमान सात दिवस आधी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीनं किंवा येरवडा कारागृहाच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्षपणे बुकींग करावं लागणार आहे. या कारागृह पर्यटना दरम्यान कोणतीही वस्तू , मोबाईल किंवा कॅमेरा आतमध्ये नेता येणार नाही. मात्र आतमध्ये गेलेल्या पर्यटकांचे फोटो काढण्याची सोय करण्यात येणार असून आतमध्ये काढलेले फोटो पर्यटकांना नंतर पुरवण्यात येणार आहेत. या जेल पर्यटनाची सुरुवात 26 जानेवारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.