भारत

राम मंदिरासाठी गौतम गंभीरने दिली 1 कोटी रुपयांची देणगी

जुना वाद आता संपला आहे, देशात एकता आणि शांतता प्रस्थापित होईल- गौतम

21 Jan :- भाजपचा खासदार असलेल्या गौतम गंभीरने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. पूर्व दिल्लीचा खासदार आणि माजी क्रिकेटपट्टू असलेल्या गौतम गंभीरने सांगितले की जुना वाद आता संपला आहे. त्यामुळे आता देशात एकता आणि शांतता प्रस्थापित होईल. अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे अशी सर्वांचीच इच्छा असल्याचं सांगत गौतम गंभीरने आपल्या परिवारातर्फे एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा करण्याच्या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या वर्गणी अभियानाची सुरवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून झाली असून मंदिराच्या उभारणीसाठी राष्ट्रपतींनी पाच लाखांचा चेक ट्रस्टकडे सोपवला आहे. राष्ट्रपतींच्या नंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अनेक मान्यवरांनी देणगी दिली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमीपूजन करण्यात आले होते.

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेने या वर्गणी अभियानाला सुरुवात केली आहे. हे अभियाने पुढचे दिड महिना चालेल असं सांगण्यात येतंय. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातल्या 13 कोटी कुटुंबापर्यंत पोहचण्याचं लक्ष आहे. या वर्गणी अभियानातून जमा झालेल्या वर्गणीतून अयोध्येत भव्य असे राम मंदिर उभारण्याचा मानस ट्रस्टच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये अशा स्वरुपात वर्गणी गोळा करण्यात येत असून वर्गणी दिलेल्यांना त्याची पावती तसेच मंदिर आणि भगवान रामाचे एक चित्र देण्यात येणार आहे.

दोन हजारापेक्षा जास्त वर्गणी देणाऱ्या लोकांसाठी वेगळी पावती देण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून संबंधित देणगीदारांना आयकरापासून सूट मिळेल असे ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. राममंदिर उभारणीसाठी क्राऊड फंडिंगद्वारे (लोकांकडून वर्गणी काढून) 10 अब्ज रुपये जमा करण्याचा विचार विश्वहिंदू परिषदेने या आधीच व्यक्त केला होता. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून मंदिर 1000 वर्ष टिकावे या दृष्टिकोनातून दगड आणि तांब्याचा उपयोग करत ते बांधले जाणार आहे अशीही माहिती मिळते.