महाराष्ट्र

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; इतक्या जणांना दिली कोरोना लस

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लसीकरण मोहिमेचं उद्घाटन

16 Jan :- आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ झाला. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लसीकरण मोहिमेचं उद्घाटन झालं. कोरोना योद्ध्यांना लस देत ही मोहिम सुरु झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे शुभारंभ करण्यात आला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 18 हजार 338 हून अधिक म्हणजे सुमारे 64 टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षीत असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते जे.जे. रुग्णालयातील लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अमीन पटेल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.


राज्यात सकाळी 11 वाजल्यानंतर लसीकरणाला सुरूवात झाली. ज्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली तेथे मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली. बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी झाली. एकंदरीतच लस घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले. केंद्र शासनाशी कोविन ॲप संदर्भात चर्चा झाल्यानंतर लसीकरणाचे पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी घेतले जाईल, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.


अकोला (238), अमरावती (440), बुलढाणा (575), वाशीम (167), यवतमाळ (307), औरंगाबाद (647), हिंगोली (200), जालना (287), परभणी (371), कोल्हापूर (570), रत्नागिरी (270), सांगली (456), सिंधुदूर्ग (165), बीड (451), लातूर (379), नांदेड (262), उस्मानाबाद (213), मुंबई (660), मुंबई उपनगर (1266), भंडारा (265), चंद्रपूर (331), गडचिरोली (217), गोंदिया (213), नागपूर (776), वर्धा (344), अहमदनगर (786), धुळे (389), जळगाव (443), नंदुरबार (265), नाशिक (745), पुणे (1795), सातारा (614), सोलापूर (992), पालघर (257), ठाणे (1740), रायगड (260)