News

महाराष्ट्रात कोरोना लस मोफत देणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट उत्तर

मुंबई, 16 जानेवारी : कोरोनावर मात करण्यासाठी अखेर संपूर्ण देशात कोरोना लसीकरण (coronavirus vaccine) सुरू झाले आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात कोरोना लस मोफत दिली जाणार का? याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील बीकेसी येथील जम्बो लसीकरण केंद्रात राज्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिल्या कोविड योद्धा व्यक्तीला लस देण्यात आली. यावेळी मुंबईत कोविड 19 संक्रमण काळात संसर्ग झालेल्या रुग्णांची स्वत: चा जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या आरोग्य सेवकांना पहिल्यांदा कोविशिल्ड लस टोचण्यात आली आहे.

‘अजूनही संकट टळलेलं नाही. लस आली तरी काळजी घेतलीच पाहिजे.  लस घेतल्यानंतरही मास्क वापरावा लागेलच. काही देशांत हे संकट पुन्हा दुप्पट वेगाने आले आहे. ते आपल्याकडे येऊ नये यासाठी काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. आज आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘केंद्र सरकारकडून कोविड लसीकरणाबाबत महत्त्वाच्या सूचना मिळाल्या आहे. त्यानुसार कोरोना काळात लढा देणाऱ्या योद्ध्यांना सर्वात आधी लस देण्याचे ठरले आहे. नाहीतर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मीच पहिली लस टोचून घेतली असती. केंद्र सरकारकडून अद्याप लस मोफत देण्याबाबत कोणतीही सूचना आली नाही. लशीची किंमत किती असेल याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. केंद्राने याबद्दल भूमिका स्पष्ट केली तर राज्यात आम्ही पुढचा निर्णय घेऊ’ असं स्पष्ट केले.

कोरोना लस तयार करण्यासाठी आणखी काही कंपन्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना केंद्राकडून लवकर मान्यता मिळाली तर बाजारात आणखी साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला आणखी बळकट मिळेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.