बीड

सोनू सूदनं अचानक घेतली शरद पवारांची भेट; चर्चेला उधाण

मुंबई: निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केल्यावरून मुंबई महापालिकेच्या रडारवर असलेला अभिनेता सोनू सूद यानं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीबद्दल तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (Sonu Sood Meets NCP Chief Sharad Pawar)

करोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी अडकलेल्या श्रमिकांना मदत केल्यामुळं सोनू सूद चर्चेत आला होता. सोनू सूदच्या आडून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. सोनू सूदला जमते, ते राज्य सरकारला का जमत नाही, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. विरोधकांच्या या आरोपांनंतर राजकीय वादही रंगला होता. सोनू सूदला भाजप पडद्यामागून मदत करत असल्याचा आरोपही झाला होता. त्यावेळी सोनू सूद यानं ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती व वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सोनू सूद यांची भेट घेतली होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनू सूद यानं शरद पवारांची आज भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी त्यावरून वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. मुंबई महापालिकेनं आपल्या विरोधातील भूमिका सौम्य करावी, यासाठी सोनू सूद प्रयत्न करत असावा, अशीही एक चर्चा आहे.

महापालिकेनं पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानं सोनू सूद आता पुन्हा चर्चेत आला आहे. जुहू येथील निवासी इमारत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेलमध्ये रूपांतरित केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दिवाणी न्यायालयानं या प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेनं त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत एमआरटीपी कायद्यान्वये पोलीस तक्रार केली आहे. त्या विरोधात त्यानं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.