बीड

महाराष्ट्रासाठी चिंतेची बातमी, बर्ड फ्लूची अखेर एंट्री; परभणीत 800 कोंबड्या दगावल्या!

परभणी, 11 जानेवारी : कोरोनाशी (Corona) सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे (Maharashtra)आता  बर्ड फ्लूचे (Bird Flue) संकट उभे ठाकले आहे. परभणीमधील (Parbhani) मुरंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल समोर आला असून त्यात बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

परभणी येथील मुरंबा गावामध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये 800 कोंबड्या मृत्य अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती.  या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला, अशी अफवा असतानाच पशुसंवर्धन विभाग आणि प्रशासनाने पक्षांची नमुने, पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला, असे आता निष्पन्न झाले आहेय

मुरुंबा येथे पोल्ट्री फार्ममध्ये मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मुरुंबा गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी असलेल्या नागरिकांना, बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

लातूरमध्ये 400 कोंबड्यांचा मृत्यू

दरम्यान, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात 10 जानेवारी रोजी पोल्ट्री फार्ममधील 400 कोंबड्या अचानकपणे  दगावल्यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करुण नमुने घेतले असून कोंबड्या दगावल्याने लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे.

मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने अहवाल येईपर्यंत दहा किलो मिटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. केंद्रवाडी गावात वाहनांना ये -जा करण्यास देखील मनाई करण्यात आली असून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी असे आदेश काढले आहेत.