News

तुमची बँकेत FD आहे का? या बाबी माहित असणं ठरेल तुमच्या फायद्याचं

नवी दिल्ली, 09 जानेवारी: सर्व प्रकारच्या बचत योजनांमध्ये (Saving Schemes) फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) अनेकांच्या आवडीचा पर्याय आहे. विविध वयोगटातील व्यक्ती बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करण्याला पसंती देतात. त्याचप्रमाणे इतर बचत योजनांपेक्षा एफडी सर्वात सुरक्षित आणि कमी जोखीम असणारा पर्याय आहे. तुम्ही खूप कमी कालावधीसाठी ते दीर्घ काळासाठी यामध्ये गुंतवणूक करू शकता. आज आम्ही तुम्हाला एफडीशी संबंधित नियम, टॅक्ससमवेत विविध महत्त्वाची माहिती देणार आहोत. जे लक्षात घेता तुम्ही अगदी सहजरित्या या सेव्हिंग स्कीमचा फायदा घेऊ शकता.

दोन प्रकारची असते FD

साधारणपणे एफडीमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे क्युम्यूलेटिव्ह एफडी स्कीम (cumulative fixed deposit scheme) आणि नॉन क्युम्यूलेटिव्ह एफडी स्कीम (Non-cumulative fixed deposit scheme). यामध्ये तिमाही आणि वार्षिक आधारावर व्याज मिळते. शिवाय तुम्ही रेग्यूलर इंटरव्हलवर देखील व्याजाचा लाभ घेऊ शकता.

एफडीचे आहेत हे फायदे

-फिक्स्ड डिपॉझिट सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो

-यामध्ये तुम्ही जी मुळ रक्कम जमा केली आहे, त्यावर कोणतीही जोखीम नसते. एका निश्चित कालावधीनंतर तुम्हाला रिटर्न देखील मिळतो.

-बाजारात झालेल्या चढ-उताराचा एफडीवर कोणताही परिणाम होत नाही, परिणामी यामध्ये एक प्रकारे निश्चित रिटर्न मिळतो.

-या स्कीममध्ये गुंतवणूकदार मासिक स्वरुपात व्याजाचा फायदा घेऊ शकतात.

-एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना सर्वात चांगले व्याज मिळते

-कोणत्याही एफडी मध्ये तुम्ही एकदाच गुंतवणूक करू शकता. जर गुंतवणूकदारांना यामध्ये आणखी पैसे गुंतवायचे असतील तर त्यांना दुसरी एफडी काढावी लागेल.

-एफडी मॅच्यूअर होण्यासाठी ठराविक अवधी असतो. तुम्हाला निश्चित कालावधीसाठी पैसे गुंतवावे लागतील. पण एफडीचा फायदा असाही आहे की, आवश्यकता भासल्यास तुम्ही यातून पैसे काढू देखील शकता. हे देखील खरे आहे की मॅच्युरिटी आधी पैसे काढल्यास तुम्हाला मिळणाऱ्या व्याजात नुकसान सहन करावे लागेल. यावर द्यावी लागणारी पेनल्टी विविध बँकांमध्ये वेगवेगळी आहे.

एफडीवरील कर कपातीचा नियम काय आहे

मुदत ठेवींवर 0 ते 30 टक्के कर वजा केला जातो. गुंतवणूकदाराच्या आयकर स्लॅबच्या आधारे ही वजावट केली जाते. जर तुम्ही एका वर्षामध्ये 10,000 रुपयांपेक्षा अधिक पैसे कमावत असाल तर तुम्हाला एफडीवर 10 टक्के कर भरावा लागेल. याकरता तुम्हाला पॅनकार्डची प्रत जमा करावी लागेल. पॅन कार्ड जमा केले नाही तर त्यावर 20 % टीडीएस वजा केला जातो. जर गुंतवणूकदारास कर कपात टाळायची असेल तर त्याने फॉर्म 15 ए त्याच्या बँकेत जमा करावा. जे कोणत्याही आयकर स्लॅबमध्ये येत नाहीत त्यांना हे लागू होते. कर कपात टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी फॉर्म 15 एच सादर करावा.