महाराष्ट्र

9 जानेवारीपर्यंत राज्यावर आसमानी संकट

हवामान खात्याकडून इशारा

7 Jan :- राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट अद्यापही कायम असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. ऐन हिवाळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरू आहे. आताही राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण रत्नागिरीत पावसाच्या मुसळधार सरींनी हजेरी लावली आहे. लांजा तालुक्यातील कुवे घाटात अवकाळी पाऊसानं दाणादाण उडवली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवला आहे. जवळपास तासभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. शहापूरमध्येही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहापूरमध्ये सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटाने जोरदार वाऱ्यासह अचानक पावसाने हजेरी लावली. यामुळे वीट भट्टी आणि लागवड केलेल्या भाजी – पाल्यावरसुद्धा अवकाळी पावसाने परिणाम झाला आहे. इतकंच नाही तर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक संथ गतीने सुरू होती. अवकाळी पावसानं आंबा व्यवसायीक धास्तावले आहेत.

या अवकाळी पावसानं आंबा हंगाम लाबण्याची शक्यता वर्तवली जाते. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरीही बरसल्या. दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पावसाळी वातावरणामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे.