News

पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत मतं पत्रिका कोऱ्या होत्या, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

नागपूर, 06 जानेवारी :  विधान परिषद पदवीधर निवडणुकीत  (mlc election maharashtra) भाजपला (BJP) पराभवाला सामोरं जावे लागले होते. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी गंभीर आरोप केला आहे.  ‘मराठवाडा आणि पुण्यात मतदानादरम्यान मतं पत्रिका या कोऱ्या होत्या’, असा आरोप पाटील यांनी केला. याबद्दल पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणाच पाटील यांनी केली.

भाजपची दोन दिवस चिंतन बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका मांडली.

‘6 विधान परिषद निवडणूक आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर या बैठकीत चर्चा झाली.  साडेचौदा हजार ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलं यश मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. 92 नगर पंचायत निवडणुकीची योजना, 5 मनपा निवडणुका या विषयीही चर्चा झाली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

‘पदवीधर निवडणुकांमध्ये काही पक्षांना ईव्हीएम मशीन EVM का नको आणि बॅलेट पेपर का हवेत हे विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आलं आहे. कारण मराठवाड्यामध्ये पाच हजार मतपत्रिका हा कोऱ्या होत्या, पुणे मतदारसंघात काही बुथवर शेवटच्या तासांत अचानक मोठं क्षमतेपेक्षा मतदान झालं आहे, पदवीधर नसलेल्या लोकांचे मतदान झालं आहे, काही कुटुंबातील नावे गायब झाली आहेत. म्हणूनच याबाबत पुरावे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे’ अशी घोषणाच पाटील यांनी केली.

‘काही जण पाचवी, सातवी झाले सुद्धा पदवीधर मतदार होते. ही यादी मी पत्रकारांना देणार आहे. हायकोर्टातही हे प्रकरण नेणार आहे’, असंही पाटील म्हणाले.

‘मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याचा निर्णय लवकरच होणार आहे. नानाशंकरसेठ यांचे नाव दिले जाणार आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पण तुमचा संभाजीनगर नावाला विरोध आहे का? औरंगाबाद नावाला पाठिंबा आहे का ? याचा खुलासा करा’, असा थेट सवाल पाटील यांनी शिवसेनेला विचारला आहे.

‘राम मंदिरासाठी देशभरातून निधी गोळा केला जाणार आहे. राज्यात सुद्धा मंदिरासाठी निधी गोळा करण्यासाठी भाजप मोठा सहभाग नोंदवणार आहे’, अशी माहितीही राऊत यांनी दिली.