NewsPopular News

घरात पडून असलेल्या सोन्यावर व्याज मिळवण्याची संधी, सरकार Gold Monetization योजनेत बदल करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली, 06 जानेवारी: घरामध्ये पडून राहिलेलं सोनं यंत्रणेमध्ये पुन्हा आणण्यासाठी केंद्र सरकार गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम (Gold Monetization Scheme) लाँच केली होती. ही योजना अधिक आकर्षक बनवण्यासाठी सरकार यामध्ये काही बदल करण्याची तयारी करत आहे. CNBC आवाजला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार गोल्ड मॉनिटायझेशन स्कीममध्ये सामील होणाऱ्या ज्वेलर्सना सरकारकडून इन्सेटिव्ह मिळू शकतात. सीएनबीसी आवाजचे इकॉनॉमी पॉलिसी एडिटर लक्ष्मण रॉय यांनी सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती दिली आहे की, सरकार या स्कीममध्ये बदल करण्याची तयारी करत आहे. याअंतर्गत मोठ्या ज्वेलर्स रिटेल साखळीला इन्सेटिव्ह देण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेअंतर्गत ज्वेलर्सना सोन्याच्या किंमतीच्या 1.5 टक्क्यांपर्यंत इन्सेटिव्ह मिळू शकतो.

लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी होण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार याबाबतील ज्वेलर्स आणि अर्थ मंत्रालयाच्या (Ministry of Finance) अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. लवकरात लवकर याविषयी गाइडलाइन्स जारी केल्या जाण्याची शक्यता आहे. अधिकाधिक गोल्ड जमा करण्यावर सरकारचा भर असेल.

सरकारने 2015 मध्ये गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम लाँच केली होती. विविध घरांमध्ये, संस्थांमध्ये किंवा ट्रस्टमध्ये ठेवलेलं सोनं बाहेर आणून त्याचा अधिकाधिक उपयोग करणे हा यामागचा हेतू आहे. याअंतर्गत मध्यम मुदतीत 5 ते 7 आणि दीर्घ कालावधीसाठी 12 वर्षे सोने जमा करता येईल.

जमा सोन्यावर व्याज मिळवण्याची संधी

या योजनेंतर्गत तुम्ही तुमचे सोने बँकेत जमा करू शकता. यावर तुम्हाला बँकेकडून व्याज मिळेल. या योजनेची खास गोष्ट अशी आहे की पूर्वी तुम्हाला सोनं लॉकरमध्ये ठेवावं लागत असे, पण आता तुम्हाला हे सोनं सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर घेण्याची आवश्यकता नाही आणि तुम्हाला निश्चित व्याज देखील मिळेल.