महाराष्ट्र

बिबट्याच्या जोडीने दुचाकीस्वार दाम्पत्यावर चढविला हल्ला

दाम्पत्याने आरडाओरडा केल्याने बिबटे पळून गेले

5 Jan :- अकोले तालुक्यातील ढोकरी शिवारात दुचाकीवर चाललेल्या एका दाम्पत्यावर बिबट्याच्या जोडीने हल्ला चढविला. त्यात मागे बसलेली महिला जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 4) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास माधव पुंडे व मनीषा कैलास पुंडे हे दाम्पत्य सायंकाळी सातच्या सुमारास ढोकरीहून अकोलेकडे जात असताना बिबट्याच्या जोडीने अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यावर हल्ला केला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

यात मागे बसलेल्या मनीषा पुंडे यांच्या पायावर व कमरेला बिबट्याने पंजा मारल्याने त्या जखमी झाल्या. मात्र पुंडे दाम्पत्याने आरडाओरडा केल्याने परिसरातील लोकांनी धाव घेत आरडाओरडा केल्याने बिबटे पळून गेले.मनीषा पुंडे यांच्यावर अकोले येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. काही दिवसांपूर्वी शरद कचरू शेटे यांच्यावरही बिबट्याने असाच हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या हातात असलेल्या कुदळीने त्यांनी प्रतिकार केल्यानंतर बिबट्याने माघार घेतली होती.

हा परिसर बागायती असल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी मोठी जागा आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या संख्येने बिबटे दिसून येत आहेत. या बिबट्यांनी अनेकांवर हल्ले केल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी गोविंदराव पुंडे, विकास शेटे, बाबाजी पुंडे, प्रकाश पुंडे, नवनाथ पुंडे, साईनाथ पुंडे आदींनी केली आहे.