राजकारण

हातात सत्ता द्या, पहिल्याच दिवशी संभाजीनगर करुन दाखवतो

चंद्रकांत पाटील यांनी केलं वक्तव्य

4 Jan :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत औरंगाबाद महापालिकेत सत्ता आल्यास पहिल्या दिवशी संभाजीनगर, असं नामकरण करु असं म्हटलय आहे.चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केली आहे. औरंगाबादचं नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही, असंही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मनसेबाबत भूमिका स्पष्ट केली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रस्ताव नामांतराचा प्रस्ताव मागे का घेण्यात आला , असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

महापालिका आमच्या हातात द्या पहिल्याच दिवशी नामांतर करून देतो, असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. औरगांबादच्या नामकरणाचा विषय राजकारणाचा नाही. नामकरणाची कायदेशीर प्रक्रिया नव्यानं करावी लागणार आहे, असंही ते म्हणाले. सरकार चालविण्यासाठी शिवसेनेला जशी काँग्रेसची गरज आहे तशी कॉग्रेसला शिवसेनेची गरज त्यामुळे सामंजस्याने तोडगा काढावा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. पुण्याचं नाव बदलण्याबद्दल पत्रकांरांनी विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी याबाबत निर्णय घ्यायचा असतो, अशी प्रतिक्रिया दिली. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करणं हा राजकीय विषय नाही. आमच्या अस्मितेचा विषय आहे. देशावर राज्य केले, जुलूम केले त्यांची नावे का मिरवायची ? औरंजेबाचे नाव मिरवायचे ज्यांना इच्छा असेल त्यांनी मिरवावे.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ठराव झाला, त्याला कोर्टात चॅलेंज मिळाले. पुन्हा महापालिकेने ठराव करावा, राज्याला पाठवावं, केंद्रीय नगरविकास खात्याला पाठवावे.हा विषय आमच्या अस्मितेचा विषय आहे म्हणूनचं मग बाबरी मस्जिद का हटवली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका सोडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा नाही,असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मनसे आणि भाजप युतीबदल तुमच्याकडून चर्चा ऐकतोय, असंही पाटील म्हणाले. भारत हा एक देश आहे, त्यामुळेपरप्रांतियांशी संघर्ष योग्य नाही. राज ठाकरे जोपर्यंत भूमिका बदलणार नाहीत, तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता माझ्या दृष्टीने विषय संपलेला आहे, सुसंस्कृत महिला संपादिका असताना त्यांच्या नावाने असे शब्द चालतात का हाच माझा प्रश्न होता. मी तक्रार केलेली नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.