पत्नीच्या ‘त्या’ 50 लाखांच्या व्यवहाराबद्दल अखेर संजय राऊतांनी केला खुलासा, म्हणाले…
मुंबई, 28 डिसेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena mla sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsh Raut) यांना ईडीने (ED)नोटीस बजावली आहे. अखेर आज राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन 50 लाखांच्या व्यवहाराबद्दल खुलासा केला आहे. ‘हा व्यवहार 10 वर्षांपूर्वीचा आहे, मग आताच नोटीस का? असा सवालही राऊत यांनी उपस्थितीत केला आहे.
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत (sanjay raut press conference)यांनी ईडीच्या नोटिसीबद्दल पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. ईडीची नोटीस ही दीड महिन्यांपूर्वी आली होती, अशी कबुलीही राऊत यांनी दिली.
‘माझी पत्नी वर्षा राऊत हिच्या नावावर 10 वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता. मध्यमवर्गीय घराती मराठी शिक्षिका असलेल्या वर्षाने घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात ईडीला आता जाग आली आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पडत नाही म्हणून ईडीकडून नोटीस पाठवली जात आहे’ असा खुलासाही राऊत यांनी केला.
‘जर पैशांच्या व्यवहारांची चौकशीच केली जात असेल तर भाजपचे अकाऊंट उघडा, गेल्या 3 वर्षांमध्ये किती कोटींच्या देणग्या दिल्या आहे, त्याचा हिशेब भाजपच्या नेत्यांनी करावा, माझ्याकडे 20 कोटींचा हिशेब आता माझ्याकडे आहे. त्यासंदर्भातील माहिती सचिन सावंत यांनी ट्वीट सुद्धा केली आहे, भाजपच्या एका खासदाराचा एका बांधकामात सहभाग आहे, मग त्यांना नोटीस का नाही पाठवली?’ असा सवालही राऊत यांनी विचारला.
‘भाजपचे 3 नेते हे सतत ईडीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र घेऊन येत आहे. त्यानुसारच ही नेते बोलत आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपचे काही नेते आणि हस्तक हे मला सातत्याने येऊन भेटत आहे. या सरकारच्या मोहात पडू नका, हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचे ठरवले आहे. या ना त्या मार्गाने इशारे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागेही मला धमकावण्यात आले आहे’ असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केला.
काय आहे प्रकरण?
PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडकडे गेलं.
वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले होते. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे.
विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे. त्यामुळे या 55 लाखांच्या माहितीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेबरला चौकशीसाठी बोलावले आहे.