अखेर खडसेंना ईडीची नोटीस
३० डिसेंबरला राहावे लागणार ईडी समोर चौकशीसाठी हजर
26 Dece :- भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, खडसे यांनी मात्र आपल्याला अद्याप अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असे स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
याच प्रकरणातून खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे किंवा कोणते अन्य प्रकरण आहे, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. ही नोटीस म्हणजे खडसे यांना खूप मोठा धक्का आहे, हे मात्र निश्चित आहे. ईडीने बजावलेल्या नोटीसनुसार खडसे यांना ३० डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे ईडीच्या नोटीसबाबत माध्यमांनी विचारणा केली असता अशी कोणतीही नोटीस आपल्याला अद्याप मिळाली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
नोटीस मिळाल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन असे त्यांनी सांगितले. ईडीने नोटीस पाठवली असेल तर लागोपाठ सुट्ट्या आल्याने ती अद्याप पोहचू शकली नसेल, असेही ते पुढे म्हणाले. एकंदर कोणत्याही चौकशीला सामोरा जाण्यास मी तयार आहे, असाच पवित्रा खडसे यांनी घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खडसे यांना नोटीस बजावण्यामागे भाजपचा हात आहे.
ही एकप्रकारे भाजपची हुकूमशाही असून याला खडसे भक्कमपणे तोंड देतील. भाजपच्या ईडीला खडसे सीडी लावून उत्तर देतील, असे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी सांगितले. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. फडणवीस यांच्या त्रासाला कंटाळून मी भाजप सोडत असल्याचे ते म्हणाले होते. माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आता ईडीची नोटीस आल्यावर खडसे सीडी लावून धमाका करणार का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.