News

सरकारी बँकांपेक्षा खाजगी क्षेत्रातील या छोट्या बँकांमध्ये FD वर व्याजदर अधिक

नवी दिल्ली, 26 डिसेंबर: टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit FD) योजनेत 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर आयकराच्या 80 C कलमाअंतर्गत कर सवलत मिळू शकते. अशा एफडींसाठी पाच वर्षांचा लॉकइन पिरिएड असतो आणि त्याआधी रक्कम काढता येत नाही. सध्या शेअर बाजार आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर आहे आणि पुढील काही दिवस अशीच स्थिती राहील असा अंदाज आहे.   तरीही बँकांतील ठेवींवरील व्याज दर कमीच आहेत. काही बँकांनी आकर्षक टॅक्स सेव्हिंग डिपॉझिट (Tax Saving Fixed Deposit) आणल्या आहेत. नियमित निश्चित परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदार एफडीला प्राधान्य देतात. एफडींवरचं व्याज संपूर्ण करपात्र असल्याने कमी उत्पन्न गटातील गुंतवणूकदार विशेषत: हा पर्याय निवडतात.

लहान खासगी बँका देतातहेत सर्वाधिक व्याज दर

BankBazaar च्या आकडेवारीनुसार खासगी लहान बँका आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत टॅक्स सेव्हिंग एफडींवर जास्त म्हणजे 6.95 टक्क्यांपर्यंत व्याज दर (Interest rates) देत आहेत. यामध्ये सर्वात चांगला दर डीसीबी बँक (DCB Bank) देते आहे. या बँकेत  पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग डिपॉझिटवर 6.95 टक्के तर याच कालावधीसाठी इंडसइंड (IndusindBank) आणि येस बँक (Yes Bank) 6.75 टक्के व्याज दर देत आहेत.

पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग डिपॉझिटवर एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) 6.50 तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank)  5.80 टक्के व्याजदर देत आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांनी टॅक्स सेव्हिंग एफडीसाठी दिलेले व्याजदर त्या तुलनेत कमी आहेत. टॅक्स सेव्हिंग एफडीवर खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक (Axis Bank) 5.50 टक्के, आयसीआयसीआय (ICICI Bank) 5.35 टक्के, एचडीएफसी बँक (HDFC Bank) 5.30 टक्के व्याजदर देत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक व्याजदर युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) 5.55 टक्के, कॅनरा बँक (Canara Bank) 5.50 टक्के आणि भारतीय स्टेट बँक (State Bank of India) 5.40 टक्के व्याजदर देत आहेत. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) 5.25 टक्के व्याज देत आहे.

डीसीबी बँकेत टॅक्स सेव्हिंग योजनेत 1.5 लाख रुपये ठेव ठेवली तर ती पाच वर्षांनी 2.12 लाख तर तीच रक्कम युनियन बँकेत 1.98 लाख रूपये होईल. लहान बँकांचे ग्राहक कमी असतात त्यामुळे त्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगला व्याजदर देतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ग्राहक असणाऱ्या सरकारी बँका कमी व्याज दर देतात. तुम्ही अधिक व्याज दर देणाऱ्या बँकांत गुंतवणूक करू शकता पण तत्पूर्वी त्या बँका या क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या बळकट आणि चांगलं व्यवस्थापन असलेली बँका आहेत ना याची खात्री करून घ्या.

बँक बाझारने संबंधित बँकांच्या वेबसाइटवर 23 डिसेंबर 2020 ला उपलब्ध असलेल्या माहितीवरून हे दर दिले आहेत. स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड परदेशी, खासगी, स्मॉल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचीच माहिती या तक्त्यात दिली आहे. ज्या बँकांच्या वेबसाइटवर माहिती उपलब्ध नव्हती त्या बँकांना यात घेतलेलं नाही. हे व्याजदर केवळ टॅक्स सेव्हिंग डिपॉझिट पाच वर्षांच्या योजनेचे आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांचे वेगळे व्याजदर आहेत.