बीड

…पण तुम्हाला बोलावलं कुणी होतं? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे, 26 डिसेंबर :  ‘एकजण म्हणतो मी पुन्हा येईन दुसरा म्हणतो मी परत जाईन पण तुम्हाला बोलवलं कुणी होतं’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांना सणसणीत टोला लगावला. तसंच ‘मी मात्र पुन्हा येईन असंही म्हणत नाही आणि परत जाईन असंही म्हणणार नाही’ असा टोलाही पवारांनी लगावला.

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी चौफेर फटकाबाजी करत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना  चांगलाच टोला लगावला.

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी ‘पुणे हे शहर असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्रजी मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: ही गोष्ट मला सत्ताधाऱ्यांना सांगायची आहे.’ असा टोला पाटील यांनी लगावला होता.

पाटील यांच्या विधानाचा समाचार घेत अजित पवार म्हणाले की, ‘तुम्हाला 5 वर्षा करता निवडून दिले आहे. आता कुणी त्यांच्याकडे  काम घेऊन गेलं तर म्हणतील मी तर परत चाललो. तुम्हाला बोलवलं कुणी होतं’ असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना लगावला.

‘मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी फोडाफोडी केली होती. इतर पक्षातून जेव्हा आमदार घेत होते. तेव्हा त्यांना उकळ्या फुटत होत्या. आता त्यांच्या पक्षातील नेते आमच्याकडे येऊ शकतात म्हटलं की, राग आला आहे, आता कसं वाटतंय तर गार गार वाटतंय’ असं म्हणत अजितदादांनी भाजपला टोला लगावला.

इंग्लंडमध्ये कोरोनाचा तिसरा प्रकार सापडला आहे. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. ख्रिसमसलाही लोकं मोठ्या संख्येने बाहेर पडले हे चिंताजनक आहे. घरातून बाहेर पडल्या मास्क आणि सॅनियझरचा वापर नियमित करा, असं आवाहनही अजित पवार यांनी केले.

दिल्लीत शेतकरी गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करत आहे. त्यात महाराष्ट्राचे पण शेतकरी आहे आहेत. त्यांच्याशी चर्चा का नाही करत, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

मराठा आरक्षणाबाबत काहीही निर्णय घेतला की 2 मतप्रवाह दिसतात. पण प्रकरण कोर्टात आहे. त्यामुळे त्यावर जास्त बोलणार नाही. आताच्या स्थितीत सारासार विचार करून EWS चा निर्णय घेतला आहे, सरकारचा निर्णय हा मराठा समाजाच्या फायद्याचा आहे, असंही पवार म्हणाले.

’23 गावांचा समावेश पालिका क्षेत्रात  केला तर नियोजनबद्ध विकास होईल. मात्र, या आधीही समाविष्ट गावांकरता करता सरकारने मदत केली असे नाही. हा निर्णय पालिका निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून घेतला नाही’ असंही पवार म्हणाले.